प्रथमेश परबची प्रमुख भूमिका असलेला ‘ओह माय घोस्ट’ १२ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार

‘जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘फिल्मोशन पिक्चर्स’ यांच्यासह निर्माते सना वसिम खान आणि रोहनदीप सिंह यांनी एकत्रितपणे ‘ओह माय घोस्ट’ या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.वसिम खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि छायाचित्रकार आहेत. मोहसीन चावडा हे या चित्रपटाचे लेखक, संवादलेखक आहेत. अतिरिक्त संवाद लेखन निखिल लोहे यांचे आहे. हनीफ शेख यांनी अॅक्शन दिग्दर्शनाचे काम पाहिले आहे. संगीत आणि गायन रोहित राऊत यांचे आहे तर कला दिग्दर्शन खुशबू कुमारी यांनी केले आहे. पार्श्वसंगीत सत्या, माणिक आणि अफसर यांचे आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, काजल शर्मा, पंकज विष्णू, कुरूस देबू, प्रेम गाढवी, दिपाली पाटील आणि अपूर्वा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण मध्य महाराष्ट्रात औरंगाबाद येथे झाले आहे.‘ओह माय घोस्ट’ हा विनोदी पठडीतील चित्रपट असून ही जग्गू नावाच्या एका अनाथ युवकाची कथा आहे. जीवनात आपण काहीच मिळवू शकलो नाही, अशा हताश मनस्थितीत असताना त्याला स्वप्नात भुते दिसू लागतात. आपण दुर्देवी आणि अभागी असल्याने आपल्या बाबतीत असे होते आहे, असे त्याला वाटू लागते आणि त्याच्या जीवनातील समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. जग्गूला स्वतःचे आयुष्य आधीच ओझे वाटत असताना आता त्याला या भुताखेतांच्या विश्वाला सामोरे जावे लागते. या भुतांच्या माऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी तो अनेक क्लृप्त्या करतो आणि हे करत असताना त्याला जीवनातील इतर अंगांचा साक्षात्कार होतो. त्यातून त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि नवीन पहाट त्यांच्या जीवनात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *